Cyclone Tej News : मुंबईतील हवामानात मोठा बदल होत असून येत्या काळात किनारी भागांत मोठं वादळ धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Tej Cyclone News Marathi Live : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांतील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. पावसाळा संपला असून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. परंतु आता मुंबईकरांची धडधड वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुढील काही दिवसांत मुंबईत तेज चक्रिवादळ धडकण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. वादळाचा अंदाज असल्याने हवामान खात्याकडून मुंबईकरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं आधीच उकाड्याने हैराण असलेल्या सामान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २१ ऑक्टोबरला मुंबईसह गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागांमध्ये तेज चक्रीवादळ धडकणार आहे. अरबी समुद्रातील पश्चिम-वायव्य दिशांना येणाऱ्या या वादळामुळं नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय समुद्रात कुणीही न उतरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. येत्या २१ तारखेपासून मुंबईसह किनारी भागांमध्ये सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं प्रशासनाने देखील किनारी भागांत उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
अरबी समुद्राच्या आग्नेय, पश्चिम आणि वायव्य दिशेला चक्रिवादळ तयार झाल्याची माहिती आहे. समुद्रसपाटीपासून ३.१ किमी अंतरापर्यंत या चक्रिवादळाचा परिणाम दिसून येणार असून त्यामुळं लक्षद्वीप सर्वात जास्त प्रभावित होण्याची शक्यता आहे. पुढील ३६ तासांमध्ये अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार असून त्यामुळं गुजरात, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली आहे. नव्या चक्रीवादळाला भारताकडून तेज असं नाव देण्यात आलं आहे.