Monsoon Update : हवामान विभाग म्हणतंय… विदर्भात आजपासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

Monsoon Update: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी विदर्भासह, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. Monsoon Update : हवामान विभाग म्हणतंय… विदर्भात आजपासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

नागपूर : गेल्या दहा दिवसांपासून विदर्भात तापमानाचा पारा उच्चांकावर गेला आहे. दरम्यान, शनिवारी ढगाळ वातावरण असले तरी तापमानाचा पारा मात्र चढलेला होता. दरम्यान, आता विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी विदर्भासह, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

येत्या दहा जूनपर्यंत मौसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला आहे, त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली असून, येत्या चार जूनपर्यंत तो तळकोकणात म्हणजे रत्नागिरीमध्ये प्रवेश करेल तर सहा जूनपर्यंत पुण्यामध्ये दाखल होईल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यंदा राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असून, पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. दरम्यान, राज्यात सध्या उष्णतेची लाट आहे.

पुढील आठवड्यात मोसमी पाऊस दाखल होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीपार गेला आहे. विदर्भात ४५ ते ४६ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आले आहे. प्रचंड उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी उष्णता अधिक वाढत असल्याने अनेकांनी घराबाहेर पडने टाळले आहे. शनिवारी राज्यात ब्रह्मपुरी येथे ४६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांत आज आणि उद्या उष्ण आणि दमट वातावरण राहील, असे हवामान खात्याने सांगितले आहे. दुसरीकडे दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भात तीन-चार दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top