Havaman Andaj Today: राज्यात इथे विजांसह पावसाची शक्यता, विदर्भात यलो अलर्ट; पुढील 5 दिवस या भागात मुसळधार पावसाचा अंदाज

IMD Weather Report | राज्यात पावसाला पोषक हवामान असले तरी अनेक ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अशात आगामी 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक भागांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विदर्भाला यलो अलर्ट

हवामान विभागाने आज (ता. 16) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सध्या कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे. उर्वरित राज्यातही ढगाळ हवामानासह हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत. संपूर्ण विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Havaman Andaj Today havaman andaj
Havaman Andaj Today: राज्यात इथे विजांसह पावसाची शक्यता, विदर्भात यलो अलर्ट; पुढील 5 दिवस या भागात मुसळधार पावसाचा अंदाज 2

पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केलेले उपग्रह छायाचित्र. त्यानुसार मध्य भारत, झारखंड, ओडिशाच्या आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी स्थिती भीषण

जुलै अर्धा संपला असला तरी राज्याच्या विविध भागांत पावसाने ओढ दिली आहे. यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्रात सांगलीसारख्या काही जिह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नसल्याने भीषण स्थिती आहे. 15 जुलैपर्यंत हिंगोलीत सरासरीच्या फक्त 24 टक्के तर सांगलीत 28 टक्के पाऊस झाला आहे.

…तर तूट भरून निघेल

राज्यात 1 जूनपासून 15 जुलैपर्यंत एकूण 350 मि.मी.पैकी 276 मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास सरासरीमधील 21 टक्के तूट भरून येण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळणार आहे.

जोरदार पावसाचा इशारा :

  • ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, गोंदिया, भंडारा

विजांसह पावसाचा इशारा :

  • नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

मुंबईला 3 दिवस यलो अलर्ट

मुंबईत गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली असून मुंबईत 17 जुलैपासून तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 17, 18 आणि 19 जुलै रोजी मुंबईसाठी हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top