IMD Rain Alert in Maharashtra: गेल्या तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र आज राज्यात कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain Update: राज्यातील काही जिल्ह्यांना सलग तीन दिवस मुसळधार पावसाने झोडपलं आहे. विशेषत: पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. पुण्यातील भिडे पूल सलग चौथ्या दिवशी पाण्याखाली गेला असून नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. सोमवारी राज्यात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली होती. आज मंगळवारी राज्यातील विविध जिल्ह्यांत पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज कुठे कुठे पावसाची कोसळधार?
आज राज्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजात वर्तविण्यात आला आहे. यात तब्बल 15 जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी आज पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विविध धरणांतून पाण्याचा विसर्ग
पुण्यालाही सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने धरणे भरली आहेत. या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जात आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे.
यामुळे कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे व त्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश राज्य सरकारने प्रशासनाला दिले आहेत. सध्या खडकवासला धरणातून 27 हजार 16 क्युसेक्स, मुळशीतून 27 हजार 609 क्युसेक्स, चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील जवळपास सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकच्या गोदावरी नदीलाही पूर आला आहे. त्यामुळे नदीकिनारी न जाण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने (IMD Rain Updates) वर्तवला आहे. आग्नेय राजस्थान आणि परिसरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू शांत होण्यास सुरूवात झाली आहे.
हे पण वाचा
राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. आजपासून (ता. ६) राज्याच्या अनेक भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची तर विदर्भात विजांसह हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
आग्नेय राजस्थान आणि परिसरावरील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील फालोदी ते कमी दाबाच्या क्षेत्राचे केंद्र ते चुर्क, पुरुलिया, दिघा, ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. कमी दाबाच्या केंद्रापासून उत्तर ओडिशा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
मुसळधार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.