Maharashtra weather update : राज्यात ऐन गणेशोत्सवात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळालं. अशात हवामान खात्याकडून महाराष्ट्राला पुढच्या ७२ तासांचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये घाटमाथ्यावर आणि महत्त्वाच्या शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वाचा सविस्तर हवामान अंदाज…
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचा वातावरण पाहायला मिळतं. पुढील काही दिवस विदर्भ वगळता अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. आज कमी दाबाचा एक पट्टा पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणपर्यंत पुढे सरकले असल्याची माहिती आहे. यामुळे पुढच्या ७२ तासांमध्ये राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. अशात पुणे, मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात आज बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे.
पुढच्या ४-५ दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, ७२ तासानंतर पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पुणे आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यावेळी आकाशात ढग दाटून रिमझिम पाऊस पडेल. अशात आजपासून पावसाचे प्रमाण वाढणार असून तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होईल.
हे पण वाचा
घाट विभागातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडूनही आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुले नागरिकांनीही घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अनंत चतुर्थीच्या दिवशीही ढगाळ वातावरणासोबत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.