Maharashtra Weather : राज्यात पावसाचा जोर हळूहळू ओसरत असून आज राज्यात 30 जुलै रोजी कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात 1 ऑगस्टपर्यंत हवामान पावसाचेच राहणार असून या काळात कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडे मुंबई-पुण्यातही पावसाचा जोर ओसरलेला दिसतो. आगामी दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात आज पावसासाठी पोषक वातावरण असल्याने जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच कोकणात देखील पाऊस असणार आहे. विदर्भ आणि कोकणात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. मुंबईमध्ये सकाळीच पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत. पुण्यातही ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवल्याने काल अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते.
‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
आज 30 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी तर पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे; तर विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात हलका पाऊस कोसळणार, घाट परिसरात येलो अलर्ट
पुणे व परिसरात आज आकाश सामान्यत: ढगाळ राहून अति हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज घाट विभागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
30 जुलैला कसे राहील हवामान?
कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी पाऊस पडेल. या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
31 जुलैला कसे राहील हवामान?
कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे.
1 ऑगस्ट रोजी कसे राहील हवामान?
कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशा अंदाज पुणे व्यक्त केला आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 26°C च्या आसपास असेल.