Monsoon Updates: IMD ने मान्सूनबाबत दिली गुड न्यूज, एल निनोचा धोका असतानाही असा बरसणार पाऊस

Monsoon Updates, नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याकडून (IMD)नैऋत्य मान्सूनबाबत शुक्रवारी अंदाज जाहीर करण्यात आला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये भारतात पाऊस सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

हवामानातील बदल आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जून ते सप्टेंबरपर्यंत भारतामध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य राहू शकतो, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा एकदा का जोर वाढला तर ४ जूनच्या आसपासच मान्सून केरळमध्ये दाखल होईल. पण १ जूनआधी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे. IMD च्या मते, या वर्षीचा मान्सूनचा पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) ४% च्या मॉडेल त्रुटीसह ९६ % असण्याची शक्यता आहे. यामुळेच यंदाचा मान्सून हा सामान्य राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Monsoon 2023 : मान्सूनसंबंधी मोठे अपडेट्स, हवामान खात्याने दिली सगळ्यांसाठी आनंदाची बातमी

भारतीय हवामान खात्याने दिलेले महत्त्वाचे अपडेट्स…

– हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जूनमध्ये भारतात होणारा पाऊस हा सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

– जूनमध्ये भारतात दक्षिण द्वीपकल्प, पश्चिम राजस्थान, लडाखमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.

– गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३ मध्ये उष्णतेचा तडाखा कमी जाणवला तर मे २०२३ मध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.

– पुढच्या काही दिवसांमध्ये हवामानातील बदल आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

– नैऋत्य मान्सून अंदमान समुद्र, अंदमान आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागरात पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ४ जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे.

– हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या काळामध्ये नैऋत्य मान्सून भारतामध्ये सामान्य राहण्याची शक्यता आहे.

– दरम्यान, यंदा वायव्य भारतामध्ये कमी पावसाचा अंदाज आहे. तर प्रायद्वीप भारतावर अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

– हवामान खात्याच्या माहितीनुसार, वायव्य भारतात LPA च्या ९२% पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ताज्या अंदाजानुसार येत्या मान्सूनच्या काळात एल निनोची स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्यात हिंद महासागरावर सकारात्मक IOD स्थितीचे संकेत देखील आहेत, ज्यामुळे एल निनोचा प्रभाव कमी असू शकतो.

एल निनो म्हणजे काय?

एल निनो ही प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशात घडणारी एक महासागरीय घटना आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यापासून दूर असलेल्या इक्वेडोर आणि पेरू देशांच्या किनारपट्टीच्या पाण्यात दर काही वर्षांनी एल निनोचा प्रभाव पाहायला मिळतो. ही समुद्रातील उलथापालथ आहे, ज्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असतं.

समुद्राच्या पृष्ठभागाचे पाणी जेव्हा गरम होते तेव्हा ते पृष्ठभागावरच राहते. या घटनेमुळे समुद्राखालचे पाणी वर येण्यास अडथळा निर्माण होतो. एल निनोचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे पावसाचे मुख्य क्षेत्र बदलणं. म्हणजे जास्त पाऊस असलेल्या भागात कमी आणि कमी पाऊस असलेल्या भागात जास्त पाऊस पडतो. कधी-कधी याच्या उलटही घडते. यामुळे याचा थेट परिणाम शेतीवर होताना पाहायला मिळतो.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top